मुंबई : महाराष्ट्राला जागतिक मनोरंजन नकाशावर आणखी भक्कम स्थान मिळवून देणारी महत्त्वाची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (UMG) आणि भारतातील नामांकित फिल्म व कंटेंट निर्मिती संस्था एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यात धोरणात्मक भागीदारी करार जाहीर करण्यात आला.
या भागीदारीमुळे भारतीय संगीत, चित्रपट, डिजिटल कंटेंट आणि जागतिक वितरणाच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार असून भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या कराराअंतर्गत नव्या पिढीतील कलाकार, संगीतकार आणि निर्मात्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ, तंत्रज्ञान आणि वितरण नेटवर्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ गीतकार, कवी व पटकथा लेखक जावेद अख्तर, प्रसिद्ध अभिनेते व एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर, सहसंस्थापक व निर्माते रितेश सिधवानी, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे एक्झिक्यूटिव्ह वाइस प्रेसिडेंट (मार्केट डेव्हलपमेंट) ॲडम ग्रॅनाइट तसेच युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारत व दक्षिण आशियाचे चेअरमन आणि सीईओ देवराज सान्याल उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ही भागीदारी केवळ व्यावसायिक करार नसून भारतातील सर्जनशील उद्योगांना जागतिक स्तरावर नेणारी महत्त्वाची पायरी आहे. “महाराष्ट्र हे कला, संस्कृती आणि मनोरंजनाचे केंद्र असून अशा आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि तरुण प्रतिभेला चालना मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.
फरहान अख्तर यांनी सांगितले की, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबतची भागीदारी भारतीय कथनशैली आणि संगीताला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. तर जावेद अख्तर यांनी भारतीय संगीत आणि साहित्याची समृद्ध परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. ही भागीदारी डिजिटल प्लॅटफॉर्म्स, चित्रपट संगीत, स्वतंत्र कलाकार आणि नव्या स्वरूपातील कंटेंट निर्मितीसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.