पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेकडून जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ ने दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला ‘बचक्या’ टोळीतील कुख्यात सराईत आरोपी राजेश उर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९) याला अटक करून मोठे यश मिळवले आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-६चे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील निष्पन्न पाहिजे आरोपी राजेश उर्फ चौपाट्या हा अंगूर वाईन परिसरात थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. शिताफीने कारवाई करत पोलिसांनी नमूद आरोपीस ताब्यात घेतले व पुढील कायदेशीर कारवाईसाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. हा आरोपी ‘चौपाटी राजा’ या नावाने कुप्रसिद्ध असून दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या ‘बचक्या’ टोळीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे सदर आरोपी सध्या मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता.
राजेश उर्फ चौपाट्या याच्यावर यापूर्वी बंडगार्डन, लष्कर आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चोरी, जबरी चोरी, दरोडा, मारहाण, खुनाचा प्रयत्न यांसारखे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल असून, तो शहरातील सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अटकेमुळे आगामी निवडणूक काळात होऊ शकणाऱ्या संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा बसणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ही प्रभावी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखा युनिट-६चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि मदन कांबळे यांच्यासह गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली असून, शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा ठाम संदेश या अटकेतून देण्यात आला आहे.