पिंपरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, या संपूर्ण प्रचारयंत्रणेवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळख असलेले आमदार गोरखे हे जरी विधानपरिषदेचे सदस्य असले, तरी पिंपरी विधानसभा क्षेत्रात त्यांचे नेतृत्व अत्यंत सक्रिय, प्रभावी आणि मार्गदर्शक स्वरूपाचे असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातील राजकीय घडामोडी, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर आमदार अमित गोरखे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उमेदवारांसोबत सातत्याने चर्चा, नियोजनात्मक बैठका, बूथनिहाय आढावा आणि प्रत्यक्ष प्रचारातही त्यांचा सहभाग दिसत असून, यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला आहे.
मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर आणि जिजामाता रुग्णालय परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सौ. मोनिका सुरेश निकाळजे (यांचे पती श्री. सुरेश निकाळजे), श्री. गणेश रामराव ढाकणे, सौ. उषा संजोग वाघेरे आणि श्री. नानिक उर्फ नरेश रामचंद्र पंजाबी हे चारही भाजप उमेदवार उपस्थित होते. यासोबतच राजू दुर्गे, राजेश पिल्ले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान आमदार अमित गोरखे यांनी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रचाराची दिशा, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच उमेदवारांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सखोल आढावा घेतला. प्रत्येक अडचणीवर पक्ष पातळीवर तसेच प्रशासनाशी समन्वय साधून मार्ग काढण्यात येईल, असे ठाम आश्वासन त्यांनी उमेदवारांना दिले. यावेळी चारही उमेदवारांना पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडून आणण्यासाठी सुस्पष्ट नियोजन, प्रभावी प्रचार रणनीती, बूथ मॅनेजमेंट आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करण्यावर भर देण्यात आला. “संघटन हीच भाजपची खरी ताकद आहे आणि ती ताकद या निवडणुकीत दिसून आली पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश आमदार गोरखे यांनी दिले.
पिंपरी विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रचार अधिक नियोजनबद्ध, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित होत असल्याचे चित्र असून, आमदार अमित गोरखे यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्षाची रणनीती अधिक मजबूत होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.