पिंपरी : आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले. तर निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय कामकाज नसून नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास जपण्याची मोठी जबाबदारी असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधोरेखित केले.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या महत्त्वपूर्ण बैठकीला निवडणूक निरीक्षक सरिता नरके, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उत्पादन शुल्क अधिक्षक अतुल कानडे, उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, तसेच पोलिस उपायुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि निवडणूक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त सचिन पवार यांनी महापालिकेच्या वतीने निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. मतदान केंद्रांवरील सुविधा, मनुष्यबळ नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा, तसेच तांत्रिक बाबींची माहिती देण्यात आली. पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या बंदोबस्त, गस्त, सीसीटीव्ही व तांत्रिक निगराणीबाबत माहिती दिली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, “महापालिका निवडणूक ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी असते. प्रत्येक टप्पा वेळेत, नियमबद्ध आणि पारदर्शकपणे पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि निर्भय वातावरण देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.” तर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “निवडणूक शांततेत पार पाडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, आवश्यक तेवढा बंदोबस्त, गस्त आणि सततची तांत्रिक निगराणी ठेवण्यात आली आहे. कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही.”
बैठकीत एसएसटी, एफएस आणि व्हीएसटी पथकांच्या कार्यपद्धतीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने, निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व पथकांनी अधिक दक्ष राहावे, तसेच पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी सतत समन्वय ठेवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. या संयुक्त बैठकीतून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्याचा प्रशासनाचा निर्धार पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त करण्यात आला आहे.