Home Breaking News २४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत,...

२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात; लाखोंचे दागिने हस्तगत

49
0
पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेला थरारक दरोडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ यांनी ३ आरोपींना अटक केली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दरोड्याची थरारक घटना
दि. ३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.०० ते ५.३० या वेळेत शिवचैतन्य कॉलनी नं. १, शेवाळेवाडी, मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात ४ ते ५ अनोळखी दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत काउंटरची काच फोडली. दुकानातील डिस्प्ले बोर्ड व कपाटातून ५२८.८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे ₹५२.८८ लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
गुन्हा घडताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीतून आरोपींचा शोध घेतला असता ४ जानेवारी २०२६ रोजी मांजरी परिसरात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक व ताब्यात घेतलेले आरोपी
तपासात या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली—
🔹 प्रविण महादेव शिंदे (१८) – अटक
🔹 भावेश राजेश चव्हाण (२०) – अटक
🔹 राजदीप संतोष जगताप (२१) – अटक
🔹 ३ विधीसंघर्षीत बालक – ताब्यात
तांत्रिक तपासात काही आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथूनही आरोपी व विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले.
मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत
आरोपी व बालकांकडून
✔️ २२४.९२ ग्रॅम सोन्याचे दागिने
✔️ १८३ ग्रॅम चांदीचे दागिने
हस्तगत करण्यात आले असून उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी मांजरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे,
मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या जलद व अचूक कारवाईमुळे दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून, पुणे पोलिसांच्या सतर्कतेचा आणि कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय नागरिकांना आला आहे.