पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी प्रत्येक कक्षामध्ये सुरू असलेले कामकाज, कार्यपद्धती, नोंदवही व्यवस्थापन व प्रशासकीय रचना याची सविस्तर माहिती मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी घेतली.




