मुंबई : हजारो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी असून, २०२६ हे वर्ष महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासह तीन प्रमुख रस्ता प्रकल्प २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ, अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक. हा प्रकल्प सध्या अपघातप्रवण आणि अवघड मानल्या जाणाऱ्या खंडाळा-लोनावळा घाट विभागाला बायपास करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प २०२६ च्या मे किंवा जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
या मिसिंग लिंक प्रकल्पात लांब बोगदे, उंच पूल आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होणार असून, पावसाळ्यात होणारे अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना टाळता येणार आहेत.b याशिवाय २०२६ मध्ये खुले होणाऱ्या इतर दोन प्रमुख रस्ता प्रकल्पांमुळे शहरांतर्गत तसेच आंतरशहरी वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. औद्योगिक वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्याच्या आर्थिक घडामोडींनाही या प्रकल्पांमुळे गती मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर इंधन बचत, प्रदूषणात घट आणि प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. विशेषतः मुंबई–पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो खासगी वाहनधारक, बसचालक आणि मालवाहू वाहनांना याचा थेट लाभ मिळणार आहे. एकूणच, २०२६ मध्ये पूर्ण होणारे हे तीन महत्त्वाचे रस्ता प्रकल्प महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीला नवे बळ देणारे ठरणार असून, वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.