मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत ३.८९ कोटी रुपयांचे २४ कॅरेट सोने जप्त केले आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा डीआरआयने केला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट गुप्त माहितीनुसार डीआरआयच्या पथकाने बहरैनहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला ३१ डिसेंबर २०२५ रोजी अडवले. संशयाच्या आधारे प्रवाशाच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली असता, त्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला.
तपासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेतून मेणाच्या (wax) स्वरूपात सोन्याची पूड भरलेले १२ कॅप्सूल्स आढळून आले. ही कॅप्सूल्स पाण्याच्या टंबलरमध्ये अतिशय हुशारीने लपवण्यात आली होती, जेणेकरून सुरक्षा तपासणीत ती सहजपणे आढळू नयेत. एकूण ३.०५ किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.
तांत्रिक तपासणीनंतर हे सोने २४ कॅरेट शुद्धतेचे असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३.८९ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या सोन्याची अधिकृत कागदपत्रे प्रवाशाकडे नसल्यामुळे ते तस्करीचे असल्याचे स्पष्ट झाले.
डीआरआयने संपूर्ण सोन्याचा साठा जप्त केला असून, या तस्करीमागे कोणते आंतरराष्ट्रीय नेटवर्क कार्यरत आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. प्रवाशाची चौकशी करण्यात येत असून, यामध्ये आणखी काही आरोपी किंवा दलालांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत. डीआरआय, कस्टम्स आणि अन्य यंत्रणांच्या संयुक्त कारवायांमुळे तस्करांवर मोठा आळा बसत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.