Home Breaking News उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर...

उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास

मुंबई | प्रतिनिधी — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज अधिकृतपणे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल निर्माण झाली असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करण्यात आले आणि भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रकाश महाजन हे मनसेमध्ये जाण्यापूर्वी काही काळ शिवसेनेत सक्रिय कार्यरत होते. विशेष म्हणजे, कोणतीही अट, अपेक्षा किंवा पदाची मागणी न करता त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे आणि लोकाभिमुख धोरणांमुळे आपण प्रभावित झालो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच कार्यपद्धतीमुळे पुन्हा शिवसेनेत सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रवेशावेळी बोलताना पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले की, प्रकाश महाजन यांचा उचित मानसन्मान राखण्यात येईल आणि त्यांचा अनुभव, वक्तृत्व व संघटन कौशल्य लक्षात घेऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची तसेच संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी त्यांना देण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या राजकीय आणि संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत असून, विकास, प्रशासन आणि सामाजिक बांधिलकीच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मनसेतील वरिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश हा येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शिवसेनेचा जनाधार वाढण्यास मदत होईल, तर दुसरीकडे मनसेसाठी हा मोठा धक्का असल्याचेही बोलले जात आहे.