मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि व्यापारी भागांची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन राबवली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक आव्हानांवर मात करत हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे जात आहे.
या योजनेअंतर्गत १३.२५ किलोमीटर लांबीचा कच्च्या पाण्याचा (Raw Water) टनेल आणि १५.४ किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा (Treated Water) टनेल उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची पाणीपुरवठा क्षमता सध्याच्या १२० दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) वरून थेट २७० MLD पर्यंत वाढणार असून, त्यामुळे नवी मुंबईतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा ऐतिहासिक टनल ब्रेकथ्रू वहाळ गावातील शाफ्ट-४ येथे, सिडकोच्या वॉटर टनल पॅकेज-१ अंतर्गत होणार आहे. या पॅकेजचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून करण्यात येत असून, यामध्ये ८.७ किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा टनेल समाविष्ट आहे. आतापर्यंत यातील ५.५२ किलोमीटर टनेलचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे हे टनेलिंग काम जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवर सुरू असून, दख्खन सह्याद्री भागातील अॅमिग्डालॉइडल बेसाल्टसारख्या कठीण खडकांतून मार्ग काढावा लागत आहे. मर्यादित जागेमुळे यंत्रसामग्री उभारणी, हालचाल आणि मलबा बाहेर काढणे (मकिंग ऑपरेशन) ही मोठी आव्हाने होती. मात्र सिडको अभियंते आणि अफकॉन्सच्या तांत्रिक पथकाच्या समन्वयामुळे ही आव्हाने यशस्वीरीत्या पार करण्यात आली.
याआधी या प्रकल्पादरम्यान अफकॉन्सने ३.२ मीटर व्यासाच्या ‘फ्लेमिंगो’ TBM मशीनच्या मदतीने एका महिन्यात ७७७ मीटर टनेल खोदून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम याच वर्षी मे महिन्यात नोंदवलेल्या ७१४ मीटरच्या आधीच्या विक्रमालाही मागे टाकणारा ठरला. एकूणच, हेटवणे पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, भविष्यातील लोकसंख्या वाढीला तोंड देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.