पुणे | पुणे शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुणे मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नसला, तरी २०२६ हे वर्ष पुणे मेट्रोसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) मार्ग मार्च २०२६ अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
२०२५ मध्ये नवीन मार्ग नाही, पण २०२६ मध्ये मोठी झेप
गेल्या एका वर्षापेक्षा अधिक काळ कोणताही नवीन मेट्रो मार्ग सुरू झालेला नाही. सध्या पुण्यात स्वारगेट–पीसीएमसी (लाईन-१) आणि वनाज–रामवाडी (लाईन-२) या दोनच मार्गांवर मेट्रो धावत आहे. मात्र, लाईन-३ सुरू झाल्यानंतर पुणे मेट्रोला मोठा बूस्ट मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयटी हब हिंजवडीला थेट कनेक्टिव्हिटी
२३.३ किलोमीटर लांबीचा उंचावरील (एलिव्हेटेड) हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग थेट राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडीला शहराशी जोडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंजवडी परिसरात भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“लाईन-३ चे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि ठरलेल्या मुदतीनुसारच मेट्रो सेवा सुरू व्हावी. ३१ मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.”
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) या अंमलबजावणी संस्थेला अंतिम डेडलाईन देण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिव्हिल कोर्ट येथे स्कायवॉकद्वारे जोडणी
लाईन-३ ही सध्या कार्यरत लाईन-१ आणि लाईन-२ शी सिव्हिल कोर्ट स्थानकावर स्कायवॉकद्वारे जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मात्र, काही स्थानकांवरील काम अपूर्ण असल्याने सर्व स्थानके एकाच टप्प्यात सुरू होतीलच असे नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवासी संख्येत मोठी वाढ अपेक्षित
हिंजवडीतील आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर करतील, अशी अपेक्षा असून, यामुळे सध्याच्या दोन मार्गांवरीलही प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, पुणे मेट्रो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
इतर विस्तार प्रकल्पांनाही वेग
-
पीसीएमसी–निगडी (लाईन-१ विस्तार):
४.५ किमी लांबीच्या या मार्गाचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाया, पिलर आणि सेगमेंट कास्टिंग पूर्ण झाले आहे. -
स्वारगेट–कात्रज भूमिगत मार्ग:
तांत्रिक अडचणींमुळे काम सुरू होण्यास विलंब. -
रामवाडी–वाघोली आणि वनाज–चांदणी चौक (लाईन-२ विस्तार):
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. -
खडकवासला–खराडी (लाईन-४) ला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.





