पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून, यंदाची निवडणूक ‘राजकीय दिवाळी’ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घडवून आणत ‘टिकल्या’ वाजवल्या. मात्र, याला तितक्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज सर्वपक्षीय तब्बल २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश घडवून आणत राजकीय ‘सुतळी बॉम्ब’ लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने थेट सामना रंगणार आहे.
शहरातील राजकीय हालचालींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या मोठ्या प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला दिल्ली किंवा मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भाजपाच्या काळात पिंपरी-चिंचवडमधील निर्णय शहरातच होतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपाचे प्रभावी शहरनेते म्हणून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा भक्कम पाठिंबा महेश लांडगेंना मिळत असल्याचेही या घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा भाजपात झालेला प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद अधिक वाढवणारा ठरणार आहे.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे : १) माजी महापौर, उभाठा गटाचे नेते – श्री. संजोगजी वाघेरे पाटील २) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे ३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री. प्रशांत शितोळे ४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री. विनोद नढे ५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री. प्रभाकर वाघेरे ६) माजी उपमहापौर – श्री. राजू मिसाळ ७) उभाठा गटाचे नगरसेवक – श्री. अमित गावडे ८) उभाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव ९) श्री. रवी लांडगे १०) माजी नगरसेवक – श्री. संजय नाना काटे ११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी १२) श्री. प्रविण भालेकर १३) श्री. जालिंदर बापू शिंदे १४) श्री. सचिन सानप (स्वतः व पत्नी) १५) श्री. दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी) १६) श्री. सदगुरु कदम १७) श्री. समीर मासुळकर (स्वतः व पत्नी) १८) डॉ. श्री. सुहास कांबळे १९) श्री. कुशाग्र कदम २०) श्री. अशोक मगर २१) श्री. नागेश गवळी २२) श्री. प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक