Home Breaking News मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

पुणे | कोंढवा परिसराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याला पुणे शहराच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन कोंढवा परिसराशी संलग्न करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु. येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. या सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेट्रोमुळे कोंढव्याचा चेहरामोहरा बदलणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोंढवा परिसरात वेगाने नागरीकरण होत असून, वाढती लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, आयटी वसाहती आणि निवासी प्रकल्पांमुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मेट्रो प्रकल्पामुळे कोंढवा–कात्रज–स्वारगेट–शिवाजीनगर हा प्रवास सुलभ होईल, तसेच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांशी कोंढव्याचा थेट संपर्क निर्माण होईल. भविष्यात पुरंदर विमानतळाशी थेट मेट्रो जोडणी झाल्यास कोंढवा हा महत्त्वाचा ट्रान्झिट हब बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 शिवरायांचा स्वाभिमान आणि समतेचा वारसा
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टीचे, न्यायप्रिय आणि समतेचे राज्यकर्ते होते. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देणारे त्यांचे शासन होते.”
कोंढव्याची भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य अश्वारुढ पुतळ्यामुळे कोंढवा बु. परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मोगल, निजाम आणि आदिलशाहीच्या आक्रमणांच्या काळात अनेक राजे परकीय सत्तेचे मांडलिक झाले असताना, राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अठरापगड जातींच्या समाजाला एकत्र करून त्यांनी स्वराज्य उभे केले. पुढे छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचा लढा अखंड सुरू ठेवत मराठ्यांचा भगवा झेंडा दिल्लीपर्यंत नेला, असेही त्यांनी सांगितले.
 अभ्यासक्रमात शिवरायांचा गौरव
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की, सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ पानी जाज्वल इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना शिवरायांचे शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान समजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 कोंढवा परिसराचा पायाभूत विकास
आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण होणे ही कोंढवा परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुविधा यांचा पायाभूत विकास वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 विकास आणि स्वाभिमानाचा संगम
मेट्रो प्रकल्पामुळे कोंढव्याचा विकास वेगाने होणार असून, शिवरायांच्या विचारांचा वारसा आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा संगम कोंढवा परिसरात पाहायला मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घोषणांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून, कोंढव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.