Home Breaking News ३ वर्षांपासून फरार असलेला मोक्का आरोपी अखेर जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी

३ वर्षांपासून फरार असलेला मोक्का आरोपी अखेर जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी

पुणे शहरात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईत बंडगार्डन पोलीस स्टेशनने मोठे यश मिळवले आहे. मागील तब्बल तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का अंतर्गत फरार आरोपी अखेर बंडगार्डन पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या अटकेमुळे शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
सदर गुन्हा २५ ऑगस्ट २०२२ रोजी ससून रुग्णालयात घडला होता. मोक्का प्रकरणातील आरोपी असलेले फिर्यादी तुषार हंबीर हे उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल असताना, पाच अनोळखी आरोपींनी तलवार, कोयता आणि पिस्टलसारख्या घातक शस्त्रांसह त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात फिर्यादीला वाचविण्यासाठी पुढे आलेले पोलीस गार्ड आणि नातेवाईकही गंभीर जखमी झाले होते. आरोपींनी थेट गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान एकूण १२ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ११ आरोपींना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मात्र, रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातत्याने तपास सुरू ठेवत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर केसनंद, वाघोली परिसरातून या फरार आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून १२ डिसेंबर २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या अटकेमुळे या गंभीर गुन्ह्याचा तपास अधिक वेगाने पुढे जाणार आहे.
या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कितीही काळ फरार राहिले तरी गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणलेच जाईल.