मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्री सध्या दुःखाच्या सावटाखाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि ज्येष्ठ अभिनेत्री जरीन खान यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्याच काळात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक बातम्या आणि प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा तोल गेला आणि ते खाली पडले, हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत होतं की, ८३ वर्षीय जितेंद्र हे कारमधून उतरत असताना पुढच्या पायरीवर पाय घसरला आणि त्यांचा समतोल बिघडला. उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पापाराझींनी तत्काळ त्यांना उचलून सुरक्षित केले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी “जितेंद्रजी ठिक आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला. काही मीडियाकर्त्यांनी तर त्यांच्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवाही पसरवल्या. परंतु, तुषार कपूर यांनी पुढे येत सर्व चाहत्यांना शांत केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “बाबा अगदी ठीक आहेत. ही एक किरकोळ घटना होती. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. काळजी करण्यासारखं काहीही नाही.”
तुषार कपूर यांनी पुढे सांगितलं की, “वडिलांचं वय जरी अधिक असलं, तरी ते आजही उत्साही आहेत आणि दररोज व्यायामही करतात. सुदैवानं घटनेनंतर त्यांनी स्वतःच्या बळावर उभं राहत हसतच सर्वांना आश्वस्त केलं.” प्रार्थना सभेत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या घटनेनंतर सर्वांनी ज्येष्ठ अभिनेत्यांच्या आरोग्याबाबत शुभेच्छा दिल्या आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.