महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, या पार्श्वभूमीवर आजपासूनच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील लाखो मतदार आणि राजकीय पक्ष आता सज्ज झाले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकांबाबतची चर्चा रंगली होती आणि आता त्या प्रत्यक्षात पार पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
तीन टप्प्यांत होणार निवडणुका
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील निवडणुका तीन टप्प्यांत पार पडतील.
-
पहिला टप्पा : २८९ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका — या टप्प्यासाठी २१ ते २५ दिवसांचा कार्यक्रम असणार.
-
दुसरा टप्पा : ३२ जिल्हा परिषद व ३३१ पंचायत समित्या, या निवडणुका ३० ते ३५ दिवसांत होणार.
-
तिसरा टप्पा : २९ महापालिकांच्या निवडणुका, यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण कार्यक्रम काटेकोरपणे आखला आहे.
निवडणुका, मतदार आणि आरक्षण प्रक्रिया
राज्यातील ९ कोटींपेक्षा अधिक मतदार या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगरपालिकांचे आरक्षण, नगराध्यक्षांची यादी आणि मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे.
-
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर झाले असले तरी मतदार यादी अद्याप अंतिम नाही.
-
महापालिकांच्या प्रभाग आणि महापौरांचे आरक्षण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
-
तसेच ६ नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.






