Home Breaking News अंबरनाथमध्ये थरार! प्रसिद्ध महिला डॉक्टरवर पतीकडून खलबत्त्याने जीवघेणा हल्ला — केवळ “नाइस...

अंबरनाथमध्ये थरार! प्रसिद्ध महिला डॉक्टरवर पतीकडून खलबत्त्याने जीवघेणा हल्ला — केवळ “नाइस डीपी” मेसेजमुळे पेटला होता राग!

अंबरनाथ | शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. अंबरनाथ पश्चिमेतील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्या डोक्यात त्यांच्या पतीने खलबत्त्याने जोरदार हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे या आपल्या पती विश्वंभर शिंदे आणि दोन मुलांसह मोहन सबर्बिया या गृहसंकुलात राहत होत्या. बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या. रियाजपूर्वी पतीसाठी चहा तयार करण्यासाठी त्या किचनमध्ये गेल्या असताना, अचानक त्यांच्या पतीने मागून येऊन त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने हल्ला केला.
हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की, किरण यांना काही क्षण काहीच समजले नाही. त्यांनी संतापाच्या भरात पत्नीचा गळा पकडून जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलांनी किचनकडे धाव घेतली आणि आईची सुटका केली. तत्काळ त्यांना बदलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि स्थिती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली. डॉक्टर शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या एका बालमित्राने मला ‘नाइस डीपी’ असा मेसेज पाठवला होता. तो मेसेज पाहून माझ्या पतीला प्रचंड राग आला आणि त्याने संतापाच्या भरात माझ्यावर जीवघेणा हल्ला केला.”
डॉ. शिंदे यांनी पुढे सांगितले की, “या हल्ल्यात माझा जीवही जाऊ शकला असता. माझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ अटक करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी विश्वंभर शिंदे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. शहरात एका नामांकित महिला डॉक्टरवरच पतीकडून झालेल्या या हल्ल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजात पुन्हा एकदा गृहकलह, मानसिक ताणतणाव आणि महिलांविरोधातील वाढती हिंसा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.