पिंपळे निलख (पिंपरी-चिंचवड) : दिवाळीच्या आनंदी वातावरणात पिंपळे निलख परिसराने नारीशक्तीला सन्मान देणारा उपक्रम साजरा केला. कै. प्रभाकर नारायणराव साठे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने “भाऊबीज २०२५ महिला स्नेह सोहळा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पिंपळे निलख येथील मनपा शाळेसमोरील मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिक, विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिवाळीचा आनंद, नारीशक्तीचा सन्मान आणि समाजातील ऐक्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण केले.
नारीशक्ती पुरस्कार २०२५ प्रदान
फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच महिलांचा ‘नारीशक्ती पुरस्कार २०२५’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये :
आदर्श माता पुरस्कार: श्रीमती हिराबाई धरपळे
राजकीय क्षेत्र: श्रीमती आरती चोंधे
सामाजिक कार्य: श्रीमती शोभा जगताप
धार्मिक क्षेत्र: सौ. कुसुम इंगवले
उद्योजकता: सौ. रुपाली पवार
या सर्वांचा फाउंडेशनच्या वतीने स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी
‘मायबोली महाराष्ट्राची’ या थीमवर आधारित सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य, संगीत आणि हास्यरंगांची उधळण करून प्रेक्षकांची मने जिंकली. महिलांसाठी खेळ, मनोरंजन स्पर्धा आणि दिवाळी क्विझचे आयोजनही करण्यात आले, ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
महिलांसाठी साड्या आणि फराळ वाटप
दिवाळीच्या शुभप्रसंगी १,२०० हून अधिक महिलांना साड्या आणि फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम समाजातील ऐक्य, प्रेम आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक ठरला. महिलांनी या स्नेहसोहळ्याचा आनंद हसत-खेळत घेतला.
फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज साठे यांचे मनोगत
या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज साठे यांनी सांगितले —
“हा कार्यक्रम निवडणूक म्हणून नव्हे, तर समाजसेवेच्या परंपरेचा भाग म्हणून आयोजित केला आहे. अनेक वर्षांपासून फाउंडेशन गुणवंत विद्यार्थी सत्कार, विद्यार्थी दत्तक योजना, बालजत्रा आणि खेळ पैठणीचा असे उपक्रम राबवत आहे. ज्या समाजात आपण वाढतो, त्याचे देणे फेडणे हीच खरी नाती आहेत. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित नसावे — समाज एकत्र आणणारे असावे. त्यामुळे पुढेही हा उपक्रम सातत्याने राबविला जाईल.”त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “या फाउंडेशनला आपला आशीर्वाद आणि सहकार्य असेच लाभू द्या, हाच आमचा दीपोत्सवी आनंद आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात — राहुल कलाटे, नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरतीताई चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामटे, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस बाबू नायर, नितीन इंगवले, शिरीष आप्पा साठे, स्नेहा ताई कलाटे, प्रकाश बालवडकर आदींचा समावेश होता. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ, महिला बचत गट आणि स्थानिक मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.