सीकर (राजस्थान) : लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून आर्थिक फसवणुकीचा खेळ करणाऱ्या एका हायप्रोफाईल लुटेरी टोळीचा पर्दाफाश राजस्थान पोलिसांनी केला आहे. या टोळीची मुख्य आरोपी काजल उर्फ ‘लुटेरी दुल्हन’ अखेर तब्बल एका वर्षाच्या पाठलागानंतर गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. तिच्या या अटकेनंतर लग्नाच्या नावाखाली फसवले गेलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
लग्नाचे आमिष आणि फसवणुकीचा डाव ही फसवणुकीची कहाणी सीकर जिल्ह्यातील दांतारामगड पोलीस ठाण्यात सुरू झाली. ताराचंद जाट या व्यक्तीच्या दोन मुलांसाठी जयपूरच्या भगतसिंह नावाच्या व्यक्तीने लग्नाची बोलणी केली होती. त्याने आपल्या मुली काजल आणि तमन्ना यांचे लग्न ठरवले आणि लग्नाचा खर्च म्हणून तब्बल ११ लाख रुपये घेतले.
थाटामाटात लग्न, तीन दिवसांत गायब! २१ मे २०२४ रोजी खाचरियावास येथील गेस्ट हाऊसमध्ये मोठ्या थाटामाटात दोन्ही लग्ने पार पडली. पण अवघ्या तीन दिवसांत नववधू काजल, तमन्ना आणि त्यांचे कुटुंबीय रोकड, दागिने आणि कपडे घेऊन गायब झाले! लग्नाच्या आनंदाचे दु:खात रूपांतर झाले आणि पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मुख्य सूत्रधार वडीलच! या प्रकरणात पोलिसांनी चौकशीतून उघड केले की, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड काजलचा वडील भगतसिंह आहे. तो गरजू किंवा श्रीमंत अशा अविवाहित मुलांचे कुटुंब शोधून आपल्या मुलींचे लग्न ठरवत असे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात अशा अनेक बनावट विवाहांद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांची चतुराई – काजल अखेर जाळ्यात! काजल गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकमा देत होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे गुरुग्राममधील सरस्वती एन्क्लेव्ह भागात तिचा ठावठिकाणा शोधून तिला अटक केली. ती अंकित नावाच्या व्यक्तीच्या भाड्याच्या घरात लपून राहत होती.
लग्नानंतरही नवरदेवांशी संबंध नाही! धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीतील मुली लग्नानंतर काही दिवस नवऱ्यांच्या घरी राहात असत, पण त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत नसत. योग्य संधी मिळताच त्या रोकड आणि दागिने घेऊन पलायन करीत असत.
सध्या काजलला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, पोलीस आता या टोळीने देशातील इतर ठिकाणी फसवलेले संभाव्य बळी शोधत आहेत. या घटनेने समाजात ‘लुटेरी दुल्हन’च्या बनावट लग्न टोळींविषयी भीती आणि जागरूकता दोन्ही निर्माण झाली आहे.