Home Breaking News ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.२६ लाख नागरिकांची मोफत तपासणी,...

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.२६ लाख नागरिकांची मोफत तपासणी, ६,८६२ रक्तदात्यांनी दिले योगदान

85
0
मुंबई | गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमाला राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमामुळे लाखो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळाली, तर हजारो नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अभियानाचा कालावधी आणि राबविण्यात आलेली शिबिरे
२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तब्बल ७,१५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांतून ३,२६,००१ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यात १,५६,५६० पुरुष, १,४१,१०८ महिला आणि २८,३३३ बालकांचा समावेश होता.
उपचार आणि रक्तदानाचा मोठा प्रतिसाद
तपासणीदरम्यान विविध आजार आढळलेल्या ९,६६० रुग्णांना पुढील तज्ज्ञ उपचारासाठी पाठविण्यात आले. एवढेच नव्हे, तर ९५ रक्तदान शिबिरांतून ६,८६२ दात्यांनी रक्तदान केले. गणेशोत्सवात नागरिकांनी केवळ सणाचा आनंदच साजरा केला नाही, तर सामाजिक जबाबदारीही पार पाडली.
जिल्हानिहाय आढळलेली वैशिष्ट्ये
सर्वाधिक शिबिरे : सोलापूर – १२३६
सर्वाधिक तपासणी : सोलापूर – ६२,१८१
सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे – १,५९९
सर्वाधिक रक्तसंकलन : पुणे – १,६५०
बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – ७,८५०
अभियानाची वैशिष्ट्ये
या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच विविध धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला. राज्यातील अनेक गणेश मंडळांनी या उपक्रमात उत्साहाने सहकार्य करत शिबिरे आयोजित केली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचार मिळणार असून, या अभियानामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे.”
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रम राज्यात लोकाभिमुख आणि समाजाभिमुख सण साजरा करण्याचा एक आदर्श ठरला आहे.