Home Breaking News पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पुणे शहरातील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, जे रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल चोरी करत होते. ही कारवाई दि. ०३/०९/२०२५ रोजी करण्यात आली.
फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय २६, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी दानापुर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून १५,०००/- रुपये किमतीचा Vivo मोबाईल चोरी झाला असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिली. तपासादरम्यान, गुप्त माहितीनुसार संशयित इसम मंगळवार पेठ सिग्नल चौकात झोपडी टाकून राहात असून, शहरातील सामान्य नागरिकांचे मोबाईल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीसांनी सर्वेलन्स पथकाच्या मदतीने संशयित इसम बुध्दराज मोरपाल बागडी (३२) आणि अमरलाल हंसराज बागडी (२२), दोघे राजस्थान येथील राहणारे, पळताना पकडले. त्यांच्याकडून विवो कंपनीसह विविध कंपनीचे एकूण २० मोबाईल जप्त झाले, जे किंमत १,९०,४००/- रुपये इतकी होती.
सदर आरोपींची चौकशी करताना समोर आले की, हे मोबाईल जुन्या बाजारातून कोणत्याही तपासाशिवाय विकत घेऊन लोकांना कमी किंमतीत विकत असत, आणि शहरात अशी चोरी करत होते. दोघांनाही गुन्ह्यात ताब्यात घेतले असून, पोलीस अधिक्षक लोहमार्ग, श्रीमती अश्विनी सानप, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पो.शि. निलेश बिडकर, सिध्दार्थ वाघमारे, मपोशि छाया चव्हाण व अन्य पोलीस अधिकारी सहभागी होते.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रेल्वे स्थानकांवर आपले मोबाईल व महत्त्वाची वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा, तसेच संशयित हालचाली दिसल्यास तत्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.