पुणे पोलिसांनी अत्यंत चलाखीने चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने महिलेचा वेष, गाऊन, सलवार-कमीज तसेच मास्क व ओढणी घालून कंपनीत चोरी केली होती. मात्र वानवडी पोलिसांच्या तपासपथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज, चपलेचा मागोवा आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना गाठले आणि मोठी कामगिरी बजावली.
घटनेचा तपशील
दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:43 ते 3:00 दरम्यान रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील हारको ट्रान्सफॉर्म्स कंपनी लिमिटेड मध्ये दोन अनोळखी इसमांनी गज तोडून प्रवेश केला. यातील एकाने पिवळ्या रंगाचा गाऊन, तर दुसऱ्याने गुलाबी सलवार-कमीज घालून महिलेचा वेष घेतला होता. त्यांनी कंपनीच्या इन्व्हेंटरी रूममध्ये ठेवलेले तांब्याचे वायर आणि पट्ट्या असा एकूण ₹2,19,000 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
फिर्यादी कंपनीचे सीईओ यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासाची दिशा
चोरीनंतर पोलिसांसमोर आव्हान होते ते आरोपी पुरुष आहेत की महिला याचा तपास लावणे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी महिला पोशाख व ओढणी वापरल्याने तपास गुंतागुंतीचा झाला. मात्र पोलिसांनी विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच आरोपींनी वापरलेल्या चप्पलांचा मागोवा घेत गुन्हेगार ओळखले.
तपासात आरोपींची नावे अमन अजिम शेख (वय 24, रा. आनंदनगर, हडपसर) आणि मुसा अबु शेख (वय 24, रा. सदर) अशी उघडकीस आली. दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून चोरीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी महिलांचा वेश परिधान केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेला ₹2,19,000 किंमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यशस्वी कारवाई
ही कारवाई मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-5 डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आवमाने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
तपास पथकात पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे आदींचा समावेश होता. महिलेचा वेश परिधान करून चोरी करणारे सराईत गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या ताब्यात; ₹2.19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत