पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवाची उत्साहवर्धक तयारी सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी नदीवरील विसर्जन घाटांची पाहणी केली. या पाहणीस महापालिकेच्या आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभागातील अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक विसर्जन घाटावर सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसविणे, पर्याप्त प्रकाशव्यवस्था, कृत्रिम हौदांची स्वच्छता व रंगरंगोटी, गणेश आरतीची व्यवस्था, २४ तास रुग्णवाहिका, सुरक्षारक्षक, तसेच बचाव पथकाची नेमणूक करण्याचे ठोस निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच, गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त, स्वच्छतेची विशेष काळजी, आरोग्य सुविधा व तत्पर सेवा उपलब्ध करून देणे यावरही काटे यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की, “गणेश विसर्जनाच्या काळात भक्तांची मोठी गर्दी होत असल्याने, नियोजनशून्यतेमुळे अपघात किंवा गोंधळ होऊ नये यासाठी पूर्वतयारी अत्यंत आवश्यक आहे.”
या पाहणीदरम्यान शत्रुघ्न काटे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन घाटांवरील सर्व सुविधा वेळेत कार्यान्वित करण्याची मागणी केली. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
शहरातील नागरिक, गणेश मंडळे व स्वयंसेवी संस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, सर्वजण मिळून सुरक्षित, स्वच्छ व भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.