Home Breaking News धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह स्टेशन तलावात – आत्महत्या...

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह स्टेशन तलावात – आत्महत्या की कटकारस्थान? तपास सुरू

64
0
तळेगाव दाभाडे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळ गाव – बऊर) हिचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साक्षी काही काळापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा मोबाईल फोन सायलेंट मोडवर असल्याने केवळ रिंग वाजत होती, पण आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे तिच्या बेपत्ता होण्यामागे नेमकं कारण काय याबाबत कुटुंबीय चिंतेत होते. रात्री सुमारे ११ वाजता माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपत्ती व्यवस्थापन टीमने शोधमोहीम सुरू केली. निलेश संपतराव गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजु सय्यद आणि अनिश गराडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे रात्री ११:३५ वाजता साक्षीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की, ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास सुरू आहे. मृतदेह तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. काहींनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की, “फक्त २२ व्या वर्षी एवढं मोठं पाऊल का उचललं गेले? की यामागे काही गूढ कटकारस्थान दडले आहे?”
साक्षीच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून मात्र खात्री दिली जात आहे की तपास काटेकोरपणे होईल आणि मृत्यूचे खरे कारण लवकरच स्पष्ट केले जाईल.