पुणे – पुण्यातील कल्याणी नगर-मुंढवा परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला आलेले पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंडगार्डन बंधाऱ्यावरून तब्बल ९०,००० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून, यामुळे नदी काठच्या भागांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो आणि याचा थेट परिणाम पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या प्रवाहावर होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
नदीकिनारी वाहन पार्किंग, फिरण्यासाठी जाणे, तसेच पाण्यात उतरून सेल्फी घेण्याचे प्रकार टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जता दाखवली असून, बचाव पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अचानक वाढणारा पाण्याचा वेग आणि मोठा विसर्ग यामुळे पुण्यातील नदीकाठची वसाहत, झोपडपट्ट्या आणि पूल परिसर धोक्याच्या झोनमध्ये आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.