Home Breaking News समर्थ पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी : गहाळ व चोरी गेलेले ८ लाखांचे...

समर्थ पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी : गहाळ व चोरी गेलेले ८ लाखांचे १२ मोबाईल फोन हस्तगत

134
0
पुणे : शहरातील सायबर गुन्हे आणि मोबाईल चोरीच्या प्रकरणांवर समर्थ पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन (त्यात ६ आयफोन आणि ६ इतर कंपनीचे मोबाईल) हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई करण्यासाठी पोलीस दलाने केंद्र शासनाच्या सी.ई.आय.आर (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे, तसेच पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे आणि सुनिता खोमणे यांनी हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून सतत पाठपुरावा केला. या मोबाईल्सपैकी अनेक मोबाईल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तर काही इतर राज्यांत वापरले जात असल्याचे आढळून आले.
पोलीसांनी त्या मोबाईल्सचा मागोवा घेऊन वापरकर्त्यांशी संपर्क साधला, तसेच संबंधित पोलीस ठाण्यांशी पत्रव्यवहार आणि संवाद साधला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले.
ही मोबाईल परत करण्याची प्रक्रिया मा. पोलीस उप-आयुक्त परी. ०१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले यांच्या हस्ते पार पडली. या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली.
ही कामगिरी समर्थ पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने पार पाडली असून, त्यामध्ये पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनिता खोमणे आणि अर्जुन कुडाळकर यांचा विशेष सहभाग राहिला.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गहाळ व चोरी गेलेल्या मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांचा पोलीस प्रशासनावर विश्वास अधिकच दृढ झाला आहे. अशा कारवायांमुळे सायबर गुन्हेगारांवर मोठा अंकुश बसणार आहे.