Home Breaking News पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या चैन स्नॅचिंग प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी गुन्ह्यातील एक आरोपीला अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२२/२०२५, भा.दं.वि. कलम ३०४ (२) या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक कार्यरत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार धनंजय ताजणे, रविंद्र लोखंडे आणि साईकुमार कारके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शनिमंदिराजवळ, शनिवार पेठ, पुणे येथे एक संशयित थांबलेला आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून इसम सुनिल रावण शिंदे (वय २९ वर्षे, रा. श्रीरामपूर, अहमदनगर) याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत त्याने सदरचा चैन स्नॅचिंगचा गुन्हा इतर तीन साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल ६ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल हॅन्डसेट, असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईत मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाचे दुय्यम प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे आणि पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, निनाद माने, धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, अमित गद्रे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या दक्षतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून, शहरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी अटक; ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत