पुणे : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना पुणे शहर पोलिसांनी एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला. हडपसर पोलिस स्टेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजात विशेषतः तरुणाईमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान हडपसर पोलिसांनी विविध शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, फ्लेक्स, कार्यशाळा अशा विविध माध्यमांचा वापर करून जनजागृती केली. अण्णासाहेब मगर कॉलेज, अॅमनोरा स्कूल, गाडीतळ हडपसर आणि मनपा शाळा क्र. ३२ या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि त्यावरील कायदेशीर कारवाई याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याचाच पुढचा टप्पा म्हणून १६ आणि १७ ऑगस्ट रोजी हडपसर व मांजरी भागातील दहीहंडी उत्सवात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाला होर्डिंग्स, फ्लेक्स आणि थेट संवादातून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. दहीहंडीच्या रंगतदार वातावरणात पोलिसांचा हा जनजागृतीपर उपक्रम लोकांनी मोठ्या उत्साहाने आणि लक्षपूर्वक अनुभवला.
ही संपूर्ण मोहिम मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. उप आयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे आणि श्रीमती अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली.
या उपक्रमामुळे दहीहंडीच्या उत्साही वातावरणात समाजहिताचाही विचार पुढे आणला गेला असून, अंमली पदार्थ मुक्त समाजासाठी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे.
दहीहंडी उत्सवात पोलिसांचा अनोखा उपक्रम; अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवून तरुणाईत सकारात्मक संदेश