Home Breaking News पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी

पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी

94
0
पुणे – राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शहरांच्या वाढत्या लोकसंख्येला आणि प्रवासी ताणाला उत्तर देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत.”
पुणेकरांसाठी तर या बैठकीत मोठे गिफ्ट जाहीर झाले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणी करण्यास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे रोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गाड्यांची संख्या व वारंवारता वाढणार आहे.
याशिवाय, पुणे मेट्रो प्रकल्पालाही बळकटी मिळाली आहे. मेट्रो टप्पा-1 अंतर्गत बालाजीनगर–बिबवेवाडी आणि स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन मार्गिकेमुळे शहरातील दक्षिण भागाला मेट्रोशी थेट जोडणी मिळेल. परिणामी, शहरातील वाहतूककोंडी कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनेल.
पुणे–लोणावळा उपनगरीय मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नागरिक व प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर या मागण्यांना प्रतिसाद देत सरकारने हा निर्णय घेतल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेमुळे केवळ पुणे-लोणावळा प्रवासच नाही तर मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराला वाहतूक व्यवस्थेत एक नवीन युग मिळेल. रेल्वे व मेट्रो या दोन्ही सुविधांचा संगम झाल्याने प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे, तसेच पुणे महानगराच्या विकासाला वेग येणार आहे.
“पुणेकरांसाठी सुखद वार्ता! पुणे–लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो स्थानकांना मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी”