नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पद्धतीत मोठे आणि ऐतिहासिक बदल जाहीर केले आहेत. शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेचा विकास आणि न्याय्य मुल्यांकन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
सीबीएसईने जाहीर केलेल्या दोन महत्त्वाच्या बदलांमध्ये पहिला निर्णय म्हणजे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांचे पूर्णपणे डिजीटल मुल्यांकन होणार आहे. यासाठी अशा संस्थांची निवड करण्यात येणार आहे ज्यांना शाळा बोर्ड किंवा विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका डिजीटल पद्धतीने तपासण्याचा पूर्वानुभव आहे. या पद्धतीमुळे मुल्यांकन अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होईल, असे मंडळाचे म्हणणे आहे. यामुळे शिक्षकांच्या मुल्यांकनातील मानवी चुका कमी होणार असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वेळेत मिळेल.
दुसरा आणि अधिक चर्चेत आलेला निर्णय म्हणजे इयत्ता नववीच्या परीक्षेसाठी ओपन-बुक पद्धतीचा अवलंब. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत लागू होणार असून गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांना परीक्षेत पुस्तक घेऊन बसण्याची मुभा असेल, परंतु उद्देश फक्त माहिती शोधणे नाही, तर त्या माहितीचा योग्य वापर करून समस्यांचे निराकरण करणे हे असेल.
शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने हा बदल विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम-सॉल्व्हिंग कौशल्यांना चालना देईल असे मत व्यक्त केले आहे. पाठांतरावर आधारित जुनी पद्धत टप्प्याटप्प्याने कमी करून समजून घेण्यावर आधारित नवे शिक्षण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीत मोठा फरक पडणार असून, शिक्षकांनाही नव्या पद्धतीसाठी प्रशिक्षण देण्याची योजना सीबीएसईने आखली आहे. शिक्षणक्षेत्रातील जाणकारांच्या मते, हा निर्णय भारतातील माध्यमिक शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात मदत करेल.