पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या एका मोठ्या यशामध्ये, कोंढवा पोलिसांनी मोकाच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यातील १० महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्ष संतोष जाधव (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा बु.) याला अटक करून एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
हर्ष जाधवविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२१४/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहिता, आर्म अॅक्ट व मोकासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होता. गेल्या १० महिन्यांपासून तो पोलिसांना चकवून फरार होता. अखेर दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलीस अंमलदार विकास मरगळे व पुष्पेंद्र चव्हाण यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी श्रीराम चौक, कात्रज कोंढवा रोड येथे येणार आहे.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि कोंढवा तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी धाडसीपणे कार्यवाही करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर आत्तापर्यंत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेमध्ये अनेक पोलिसांचे समन्वय व तत्परता लक्षणीय ठरली.