पुणे – बाणेर परिसरात विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अत्यंत कौशल्याने सोडवला आहे. चेन स्नॅचिंग, मोबाईल हिसकावणे आणि सांस्कृतिक साहित्य चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना १ : बालेवाडीतील चेन स्नॅचिंग प्रकरण
दि. ११ जुलै २०२५ रोजी पर्ल सोसायटी, बालेवाडी येथे एका महिलेला दोन अनोळखी इसमांनी अॅक्टीवा गाडीवर येत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. बाणेर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तब्बल ७४ सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपी शफिक मोदीन शेख (वय २६, रा. तलवडे) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
घटना २ : मोबाईल हिसकावणे
दि. २८ जुलै २०२५ रोजी फिर्यादी मोबाईल अॅपवर रॅपिडो बुक करत असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचा ₹१०,००० किंमतीचा विवो मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तपासानंतर आरोपी फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. वाकड) याला अटक करण्यात आली असून चोरी गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
घटना ३ : सांस्कृतिक वाद्यपथकातील साहित्य चोरी
दि. २६ जून २०२५ रोजी नवचैतन्य हास्य क्लब, पाषाण-सुस खिंड येथे एका सांस्कृतिक पथकाचे ३० ताशे चोरीस गेले होते. पोलिसांनी ४४ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी वसीम हसीबुर शेख (वय २२, रा. सुसगाव फुटपाथ) याला अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेल्या १२ ताशांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्रशंसनीय तपास व पोलिसांची सजगता
या तिन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी गुप्त बातम्यांचे संकलन, घटनास्थळाची बारकाईने पाहणी, आणि तांत्रिक पुराव्यांचा कौशल्याने वापर करून आरोपींना तावडीत पकडले. ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पो.नि. (गुन्हे) अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव, नंदकुमार कदम तसेच गुन्हे शाखा युनिट ४ व बाणेर पोलिसांचे तपास पथक सहभागी झाले होते.
अटक आरोपींचे गुन्हेगारी स्वरूप :
शफिक शेख : सराईत चेन स्नॅचर
फिरोज शहा : मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा सदस्य
वसीम शेख : वाद्य साहित्य चोरणाऱ्या टोळीशी संबंधित
नागरिकांमध्ये विश्वास, गुन्हेगारांमध्ये भीती!
या कारवायांमुळे बाणेर परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास दृढ झाला असून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी ते कायम सज्ज आहेत.