पुणे शहराच्या बाणेर परिसरात एका युवकाकडून बेकायदेशीर देशी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कारसह एकूण ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.
बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रविराज ऑटोमोबाईल समोर, विलास तात्यानगर, बालेवाडी येथे एक इसम अवैध शस्त्रासह काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्या इसमाला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सिद्धेश्वर दिगंबर ढेरे (वय ३२, रा. पाटील वस्ती, पुणे) असल्याचे सांगितले. त्याच्याकडून देशी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, व एक्सयुव्ही महिंद्रा कार असा एकूण ₹६,००,२०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या आरोपीविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त मा. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त सोमय मुंडे, व सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अलका सरग, सपोनि के. बी. डाबेराव आणि इतर पोलीस कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता.
ही कारवाई केवळ पोलिसांची दक्षता नव्हे, तर शहरात अवैध शस्त्रांची गुन्हेगारी रोखण्यासाठी एक मोठा इशारा आहे. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत संभाव्य गुन्हा टाळला आणि नागरिकांचा विश्वास आणखी दृढ केला.