प्रतिनिधी | नागपूर :- २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती ठरलेली आणि भारतासाठी अभिमानाची ठरणारी पहिली भारतीय महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
या सन्मान समारंभाला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०५ वाजता नागपूर येथे पार पडलेला हा सोहळा केवळ एक नागरी सन्मान नव्हे, तर एक ऐतिहासिक उत्सव ठरला. दिव्या देशमुख हिच्या बुद्धिबळातील कौशल्याने आणि शांत संयमाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दिव्याने फक्त बुद्धिबळ खेळले नाही, तर भारताच्या भविष्यासाठी प्रेरणा निर्माण केली आहे. तिचा हा विजय केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण देशाचा विजय आहे.”
कार्यक्रमात दिव्याच्या आई-वडिलांचा देखील विशेष गौरव करण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते बुद्धिबळ प्रेमींनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली आणि “भारत माता की जय” च्या गजरात संपूर्ण सभागृह दुमदुमले.
FIDE महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुखचा भव्य नागरी सन्मान सोहळा! “दिव्या देशमुख” हे नाव आता केवळ खेळाचे नव्हे, तर अभिमानाचे प्रतीक!