पुणे – शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीचा मोठा भांडाफोड पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात चक्क पुण्यातील एरंडवणे भागातील स्वतःला चित्रपट निर्माता म्हणवणाऱ्या शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, संवत्सरकार याने चिनी सायबर गुन्हेगार ‘बाम्बिनी’ सोबत संगनमत करत ‘सायबर फसवणुकीसाठी बँक खाते’ उपलब्ध करून दिले होते. या बँक खात्यावर ८६ लाख ४३ हजार ११९ रुपये जमा झाल्याचे तपासात उघड झाले असून, या बँक खात्याशी संबंधित एकूण १५ तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.
फसवणुकीचा प्रकार असा उघड
एक फिर्यादी यूट्यूबवर शेअर बाजारावरील माहिती पाहत असताना, एक व्हॉट्सअॅप लिंक दिसली. त्या लिंकवर संपर्क साधल्यानंतर, त्यांना “Abott Wealth” नावाच्या अॅपवर गुंतवणूक करण्यास सांगितले गेले. सुरुवातीला ५७,००० रुपये, नंतर ७०,००० आणि मग ६७० रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे IDFC बँकेच्या ‘बालाजी इंटरप्रायझेस’ नावाच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते.
पोलिसांनी या खात्याचा तपास केल्यावर, ते शिवम संवत्सरकार याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासादरम्यान, त्याने आधी “मी चित्रपट निर्माता आहे, मी असं काही करणार नाही” असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांच्या सखोल तपासामुळे खरा चेहरा उघड झाला.
‘बिझनेस’च्या नावाखाली सायबर फसवणूक
संवत्सरकार याने स्वतःचं बँक खाते ‘बालाजी इंटरप्रायझेस’ या बनावट नावाने वापरून चिनी गुन्हेगारांसोबत सायबर गुन्ह्यांचे व्यवहार केले. बँक खात्यावर झालेल्या सर्व ट्रान्सफर, रक्कमांचे मार्ग, आणि इतर तांत्रिक तपशील पोलीस तपास करत आहेत.
ही प्रकरण केवळ एकाच व्यक्तीची नाही, तर देशभरातील अनेक लोक यामध्ये फसले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा भाग असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे.