महाड, रायगड | २४ जुलै २०२५: रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेले ८८.९२ कोटी रुपयांचे ‘केटामाईन’ अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या कारवाईने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे.
ही धक्कादायक माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची तातडीने स्थापना करण्यात आली. त्यानंतर विविध विभागांतील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने E-26/3, रोहन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड, मौजे जिते, महाड येथे छापा टाकण्यात आला.
या कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आले असून, आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
मच्छिंद्र तुकाराम भोसले (रा. जिते, महाड)
सुशांत संतोष पाटील (रा. माहोप्रे, महाड)
शुभम सदाशिव सुतार (रा. पाचगाव, कोल्हापूर – सध्या नांगलवाडी, महाड)
रोहन प्रभाकर गवस (रा. मालाड, मुंबई)
या सर्वांनी मिळून बेकायदेशीररित्या केटामाईन तयार करून त्याचा अवैध व्यापार करण्याचे संगनमत केले होते. याप्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या धाडसी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, महाड MIDC, पोलादपूर व महाड शहर पोलिसांचे अधिकारी, तसेच अॅन्टी-नार्कोटिक्स युनिट मुंबईचे विशेष पथक सहभागी झाले होते. अंमली पदार्थांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला जप्तीचा प्रकार हा महाराष्ट्रासाठी एक अत्यंत गंभीर इशारा मानला जात आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पोलिस पथकाचे भरभरून अभिनंदन केले आहे.
✅ ही कारवाई केवळ अंमली पदार्थ निर्मितीचा पर्दाफाश नव्हे, तर त्यामागे असलेल्या मोठ्या रॅकेटवर पोलिसांनी दिलेला जबरदस्त फटका आहे. ✅ जनतेने संशयास्पद हालचाली अथवा माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.