रायगड / महाड : रायगड जिल्ह्यातील महाड-दापोली राज्य मार्गावर एका एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही पुणे फौजी आंबवडे मार्गावरील एसटी बस आंबवडे दिशेने जात असताना, रस्त्यावरील नियंत्रण सुटून बस थेट रस्त्याच्या कडेला घसरून खाली दरीत आदळली.
या अपघातामध्ये एकूण १० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ८ प्रवासी गंभीर जखमी, तर २ किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने महाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुर्घटनेचे दृश्य अत्यंत भीषण होते.
जखमी प्रवाशांची यादी पुढीलप्रमाणे –
अविनाश लोखंडे (३४) – चालक, पिंपरी-चिंचवड
पौर्णिमा होन कडसे (४६) – वाहक, पुणे
आशाबाई जाधव (७५) – फौजी आंबवडे
शारदा शेलार (६७) – फौजी अंबवडे
सोहम पवार (१७) – फौजी अंबवडे
सिमाब पेडेकर (१६) – शिरवली
सलवा पेडेकर (१७) – शिरवली
आराधना पवार (१७) – फौजी अंबवडे
लहू पाते (५५) – पांगरी
विश्वजीत कदम (२७) – शिरवली
अपघाताचे प्राथमिक कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत घसरली. वाहनाचा वेग, खराब रस्ता किंवा अचानकपणे समोर आलेला अडथळा यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सविस्तर तपास पोलीस आणि एसटी प्रशासनाकडून सुरू आहे.
प्रशासनाची तात्काळ मदत:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य वेगाने सुरू करत जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
प्रश्न निर्माण करणारी सुरक्षा यंत्रणा:
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीती पसरली आहे. एसटी महामंडळाकडून रस्त्यांवरील सुरक्षा, वाहनांची स्थिती आणि चालकांचे प्रशिक्षण या बाबतीत अधिक काटेकोर धोरण राबवावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
लालपरीवरचा विश्वास अजूनही तग धरतोय, पण रस्त्यांवरील सुरक्षेचं काय?