Home Breaking News हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!

हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!

पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे.
हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड वाहतूक गोंधळ निर्माण होत होता.
कुठे झाली कारवाई?
विप्रो सर्कल: १४ अतिक्रमणं हटवली
लक्ष्मी चौक ते मेझा नाईन: ३८ अतिक्रमणं
माण रोड: ६६ अतिक्रमणं
लक्ष्मी चौक ते मारुंजी: ७३ अतिक्रमणं
माण गावनाला: २८ अतिक्रमणं
अनधिकृत होर्डिंग्ज: १९ होर्डिंग्ज काढण्यात आले
या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे काही नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवण्यास सहकार्य केलं, ज्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात सकारात्मक संबंध निर्माण झाले आहेत.
भविष्यातील उपाययोजना सुरू
PMRDA केवळ सध्या कारवाई करून थांबलेले नाहीत, तर पुढील वाहतूक अडचणी टाळण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्मशान भूमी रोड, वाकड रोड, फेज १, मारुंजी रोड या ठिकाणी सर्वेक्षण सुरू असून भविष्यातील अतिक्रमणांवर वेळीच कारवाई केली जाणार आहे.
केंद्रीय नियंत्रण यंत्रणा स्थापन
या सर्व मोहिमेचे यशस्वी संचालन आणि समन्वय साधण्यासाठी एक केंद्रीय नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे, जी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून काम अधिक गतिमान करणार आहे.
या पावलांमुळे हिंजवडीमधील रस्ते अधिक मोकळे, सुरक्षित आणि गतीशील होणार असून, येथील आयटी कर्मचाऱ्यांना, रहिवाशांना आणि व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.