पिंपरी-चिंचवड | मोशी – सासरच्यांनी हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
ही दुर्दैवी घटना १७ जुलै रोजी घडली असून किरण आशिष धामोदर (वय – उल्लेख नाही) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संजय हरिभाऊ दोड (वय ५८, रा. जवळखेड बुद्रुक, अकोट, अकोला) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या मते, किरण हिचा विवाह आशिष दीपक धामोदर (वय ३२, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी; मूळ गाव – कावसा, अकोला), याच्यासोबत झाला होता. त्याच्यासह सासू सुनंदा दीपक धामोदर (वय ५०) आणि सासरे दीपक तुकाराम धामोदर (वय ६०) यांनी किरणवर हुंड्यासाठी वारंवार दबाव टाकत शारीरिक व मानसिक त्रास दिला.
लग्नात अपेक्षित हुंडा न दिल्याने आरोपींनी वेळोवेळी पैशांची मागणी करत एकूण ५ लाख रुपये घेतले. त्यानंतरही अधिक पैशांची व मोटारसायकलची मागणी करून किरण हिला शिवीगाळ, मारहाण आणि धमकी देत त्रास दिला. या त्रासाला कंटाळून किरणने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आशिष धामोदर याला अटक करण्यात आली असून भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हा प्रकार समाजमनाला हादरवून सोडणारा असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा असूनही असे प्रकार थांबत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. यामागची मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे.