मुंबई – कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला आज सकाळी धावपट्टीवर उतरताना मोठा अपघात टळला. मुसळधार पावसामुळे रनवे ओला झाल्याने विमान घसरले आणि एका बाजूने थेट गवताळ भागात घुसले. यामुळे विमानाच्या उजव्या इंजिनाचे नॅसेल (बाह्य कवच) तुटले, तसेच रनवेवरील साईनबोर्ड आणि लाईटही तुटले. सुदैवाने, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
दृश्यंनी उलगडली थरारक क्षणांची कहाणी विमानाच्या मागच्या भागाला गवत चिकटलेले असून उजव्या इंजिनावर गंभीर खरोच आणि तडे दिसून येत आहेत. हे स्पष्ट संकेत आहेत की विमानाचा एक भाग थेट जमिनीवर आदळला. विमानाच्या एका चाकाने रनवेवरील गवताळ बाजूला प्रवेश केल्याचे सूत्रांनी सांगितले.
रनवेचेही मोठे नुकसान; वैकल्पिक रनवे सुरु या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्राथमिक धावपट्टी क्रमांक 09/27 ला किरकोळ नुकसान झाले असून तात्पुरती दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तातडीने दुसरा रनवे क्रमांक 14/32 सुरु केला असून विमानतळावरील उड्डाणे आणि आगमन सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
वैमानिकांना सेवेतून बाजूला; चौकशी सुरू एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमान तात्पुरते थांबवण्यात आले असून सखोल तपासणी सुरू आहे. अपघातानंतर दोन्ही वैमानिकांना सेवेतून बाजूला ठेवण्यात आले आहे आणि DGCAने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत आजच्या दिवसभरात मुंबईत सतत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत पाणी साचले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना फ्लाइट स्टेटस तपासण्याचे आवाहन केले असून वेळेआधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्लाही दिला आहे.
एअर सेफटीवर पुन्हा प्रश्नचिन्ह ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया AI 171 दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यामुळे DGCA आता प्रत्येक घटनेकडे गंभीरतेने पाहत असून सुरक्षा प्रोटोकॉलची तपासणी वाढवली आहे.