पुणे | मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखा युनिट ६ ने अवघ्या २४ तासांत एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधडकीस आणला. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपास कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
घटनेचे सविस्तर विवरण
दि. १३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री मांजरी खुर्द येथील कॅनरा बँक शाखेचे बाहेरचे शटर तोडून, अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बँकेतील तिजोरी फोडण्याचा उद्देश होता. परंतु वेळेत कारवाई झाल्यामुळे चोरी थांबवता आली. या प्रकरणी वाघोली पोलीस चौकी येथे गुन्हा क्रमांक ३३५/२०२५ नोंद करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा तपास
घटनेच्या गांभीर्यामुळे याचा तपास गुन्हे शाखा युनिट ६ कडे वर्ग करण्यात आला. स.पो.नि. मदन कांबळे आणि स.पो.नि. राकेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे आणि बाळासाहेब तनपुरे यांनी यातील एक आरोपी हा विधीसंघर्षित बालक असल्याचे ओळखले.
गुप्त माहितीवरून सापळा रचला
दि. १५ जुलै रोजी, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर विधीसंघर्षित बालक स्मशानभूमी, मांजरी खुर्द येथे येणार आहे. त्यानुसार, स.पो.नि. राकेश कदम आणि त्यांच्या टीमने सापळा रचून त्याला अटक केली.
अतिरिक्त माहिती
तपासादरम्यान या बालकाने कबूल केले की, त्याने दोन साथिदारांच्या मदतीने हा गुन्हा केला. पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य –
लोखंडी कटावणी
मोठी लोखंडी कैची
कानस
मार्बल कटर मशीन यासह अनेक साधने हस्तगत केली आहेत. पोलीस आता उर्वरित दोन साथिदारांचा शोध घेत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास टीमचा गौरव
ही कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील टीमचा सर्वत्र गौरव केला जात आहे. त्यामध्ये स.पो.नि. राकेश कदम, स.पो.नि. मदन कांबळे, प्रशांत कापुरे, नितीन मुंढे, बाळासाहेब तनपुरे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार यांच्यासह २० पेक्षा अधिक पोलीस अंमलदारांचा सहभाग होता.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू
सदर विधीसंघर्षित बालकास बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.