पुणे शहरातील वानवडी पोलिसांनी एका गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात उल्लेखनीय तपास करत आरोपीस शिक्षा होण्यासाठी सक्षम पुरावे सादर केले. वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक ५९६/२०१७ नुसार, भादंवि कलम ३५४, ३५४ (A), ३५४ (ए) सह ‘पोस्को’ कायदा २०१२ अंतर्गत कलम ७, ८, ११, १२ नुसार, आरोपी आकाश महादेव कांबळे याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.
ही संतापजनक घटना २९ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. पीडित मुलगी घराच्या गॅलरीमध्ये खेळत असताना आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला खोलीत नेले आणि तिच्यावर अश्लील कृत्य केले. सुदैवाने पीडितेच्या आईने वेळीच घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप केला आणि गुन्हा उघडकीस आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी व्हि. घाटे यांनी अत्यंत दक्षतेने आणि संवेदनशीलतेने केला. तपासात मिळालेले पुरावे व साक्षी यांचा योग्य पद्धतीने मागोवा घेत स्पेशल सेशन केस क्र. १६८/२०१८ दाखल करण्यात आला.
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी आकाश कांबळे यास ४ वर्षांचा सश्रम कारावास, १५,००० रुपयांचा दंड, आणि दंड न भरल्यास ५ महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता मिलींद दातरंगे व कोर्ट पेरवी पोलीस अंमलदार दिनेश जाधव यांनी खणखणीत भूमिका निभावली.
पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी परिमंडळ ५ चे मा. पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपासी अधिकारी पीएसआय वर्षाराणी घाटे आणि कोर्ट पेरवी अधिकारी दिनेश जाधव यांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ही घटना आपल्याला सतर्क राहण्याची आणि समाजात अशा विकृत प्रवृत्तींविरोधात कठोर भूमिका घेण्याची आठवण करून देते. पुणे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेमुळे न्याय मिळाला आहे.