Home Breaking News धुळेच्या औद्योगिक विकासाला नवे पंख! ‘लॉजिस्टिक हब’ उभारणीस मुख्यमंत्री फडणवीस यांची गती

धुळेच्या औद्योगिक विकासाला नवे पंख! ‘लॉजिस्टिक हब’ उभारणीस मुख्यमंत्री फडणवीस यांची गती

100
0
मुंबई – धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे धुळे विधानसभा मतदारसंघाच्या विविध मुद्द्यांवर बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या नागरी सुविधा, उद्योग विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
धुळे येथे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि आर्थिक संभावनांचा विचार करता, लॉजिस्टिक हब ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिक अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच देवपूर, वलवाडी आणि सखल भागांतील पावसाचे पाणी निचऱ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले.
महत्त्वाचे निर्णय:
शहराच्या विस्तारानुसार डीआय पाईपलाइन टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार.
औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प (बॅटरी स्टोरेजसह) उभारणीस गती.
भुयारी मलनिस्सारण योजनेसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर.
पाणीपुरवठा व पथदिवे यासाठी महापालिकेच्या खर्चात सौर प्रकल्पाद्वारे कपात करण्याची योजना.
46.46 चौ. कि.मी. वरून 101.08 चौ. कि.मी. पर्यंत वाढलेल्या हद्दीसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर.
चाळीसगाव रोडलगत म्हाडा जागेवर शॉपिंग सेंटर आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्याच्या कामास गती.
या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल, संबंधित विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांमुळे धुळे शहराच्या औद्योगिक, नागरी आणि पर्यावरणपूरक विकासाला निश्चितच गती मिळणार आहे.