पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने मोठी कारवाई करत तब्बल ₹७,८८,१००/- किंमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) व गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ही विशेष कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, ही धडक मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
१) हडपसरमध्ये कारवाई: अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि त्यांच्या टीमने मांजरी रोड चौक, पुणे येथे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सापळा रचून राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६) या दोघांच्या ताब्यातून ₹२,१५,५००/- किंमतीचा ३ किलो ५६० ग्रॅम अफीमचा दोडाचुरा (पॉपीस्ट्रॉ) जप्त केला. यावरून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६५२/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
२) खडकीमध्ये मोठा गांजाचा साठा: याच पथकाने खडकी पोलीस हद्दीतील वाकडेवाडी, जुना मुंबई-पुणे महामार्गावर जोग सेंटरसमोर छापा टाकून भागवत मंडलीक, मुसीम शेख व महेश कळसे या तिघांच्या ताब्यातून एकूण ₹५,७२,६००/- किंमतीचा २१ किलो ८६० ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं. /२०२५ नुसार एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमागील यशस्वी पथक: ही मोठी यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त श्री. निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांचे पथक: प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढर, संदीप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.
पोलिसांचे मत: या कारवाईतून पुणे शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थ वितरणाच्या साखळीला जोरदार धक्का बसला आहे. पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवायांमध्ये अजूनही अधिक गती आणून शहरातील तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.