Home Breaking News बांगलादेशातून बोलावून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची धडक कारवाई

बांगलादेशातून बोलावून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची धडक कारवाई

51
0
पुणे शहरात पुन्हा एकदा मानव तस्करी व वेश्याव्यवसायातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी केलेल्या तात्काळ आणि काटेकोर कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीला अमानवी मार्गाने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निर्भय कार्यवाही करत बांगलादेशातून बोलावून मुलीला जबरदस्तीने बेंगळुरूमध्ये व नंतर पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना ऊर्फ पारुल (वय २५, मुळ बांगलादेश) हिने तिच्या मावस बहिणीला म्हणजेच अल्पवयीन पीडितेला “काम मिळवून देते” असे आमिष दाखवून बेंगळुरूस बोलावले. तिला धमकावून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले आणि नंतर पुण्यातील बुधवार पेठेमध्ये पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणात तिचा मित्र अभिषेक प्रकाश सथेबेन्नुर याने सक्रिय सहभाग घेतला होता. पीडित मुलीने विरोध केला असता तिला मारहाण, शिवीगाळ आणि गायब करण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २८५/२०२५) दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध अनेक गंभीर कलमांखाली, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO), पीटा अ‍ॅक्ट, व विदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
या संपूर्ण तपासात आणि यशस्वी अटकेसाठी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त श्री. मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, सद्दाम हुसेन फकीर, मिरा किंद्रे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
पोलिसांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद असून, या कारवाईमुळे मानव तस्करीच्या टोळीला जोरदार झटका बसला आहे. पोलीस दलाने केलेल्या या कृतीमुळे अनेक निरपराध मुलींचे जीवन वाचवले जाऊ शकते.