पहिली कारवाई – चोरीची स्प्लेंडर विक्रीसाठी येणार, सापळा रचून अटक!
पोलीस अंमलदार सचिन पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पेरणे फाटा, लोणीकंद येथे सापळा रचण्यात आला. आरोपी दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, शिरूर, पुणे) याला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह पकडण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर गाडीच्या नंबरवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये नोंद झालेला गुन्हा असल्याचे उघड झाले.
दुसरी कारवाई – भावडी रोडवर संशयित फिरताना होंडा दुचाकीसह पकडला!
भावडी रोड, वाघोली परिसरात गस्त घालत असताना पोलीस पथकाने मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१, रा. रांजणगाव) याला होंडा दुचाकीसह अटक केली. सदर दुचाकी म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील २०२३ मध्ये नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी व गाड्या संबंधित पोलिसांच्या ताब्यात
दोन्ही आरोपींना चोरीच्या गाड्यांसह कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे चोरीच्या दुचाकी विक्रीचे रॅकेट उघडकीस आले असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांचे कौतुकास्पद काम
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांच्या पथकातील सर्व पोलिसांनी उत्कृष्ट समन्वयातून ही कारवाई यशस्वी केली.