पुणे :- हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून अचानक बेपत्ता झालेली १६ वर्षीय मुलगी पुण्यात सापडली. आई-वडिलांशी झालेल्या किरकोळ वादामुळे मानसिक तणावात आलेल्या या मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले. मात्र पुणे शहरातील पोलिसांच्या सजगतेमुळे आणि सहृदयतेमुळे ही मुलगी सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली.
पुण्यात पोहोचल्यावर ही मुलगी बुधवार पेठ परिसरात एकटीच फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि संभ्रम स्पष्ट दिसत होता. ती कुठे जायचं, काय करायचं हेच न ठरवता केवळ मनाच्या क्षणिक अवस्थेत बाहेर पडली होती. तिच्या अशा अस्वस्थ हालचालींवर एक पोलीस मित्र तेजश्री कुपरे यांचे लक्ष गेले. त्यांनी काहीतरी गडबड असल्याचे ओळखून तात्काळ ही माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिली.
या माहितीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगी खूपच घाबरलेली होती, परंतु पोलीसांनी मायेने केलेल्या चौकशीनंतर तिने हळूहळू विश्वासाने सगळी माहिती दिली. ती हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा गावातील असल्याचे निष्पन्न झाले. घरात झालेल्या किरकोळ वादामुळे ती नाराज होऊन घरातून निघाली होती.
दरम्यान, हिंगोली पोलिसांकडे तिच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती आणि गु.र.नं. ४४८/२०२५ भादंवि १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पुणे पोलिसांनी तातडीने हिंगोली पोलिसांशी संपर्क साधत ही मुलगी सुरक्षित आढळल्याची माहिती दिली.
फरासखाना पोलिसांनी तिच्या मानसिक अवस्थेची काळजी घेत तिला धीर देत सुरक्षित ठेवले आणि हिंगोली पोलिस व नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्त केले.
या यशस्वी कामगिरीमध्ये पुढील अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले:
🔸 मा. अपर पोलीस आयुक्त – श्री. राजेश बनसोडे 🔸 मा. पोलीस उप-आयुक्त – श्री. कृषिकेश रावले 🔸 मा. सहाय्यक पोलीस आयुक्त – श्रीमती अनुजा देशमाने 🔸 वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री. प्रशांत भस्मे 🔸 पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्री. अजित जाधव
तपास पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी:
अरविंद शिंदे, उत्तम नामवाडे, वैभव गायकवाड, गजानन सोनुने, रेखा राऊत, सारीका गुंजाळ, अनिता साबळे, मनिषा पुकाळे, अर्चना ढवळे, सोनाली भालेराव, तसेच पोलीस मित्र तेजश्री कुपरे, प्रसाद बनसोडे व कार्तीक घोडेकर यांचा समावेश होता.