Home Breaking News पुण्यातील धक्कादायक दरोडा प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अखेर जेरबंद!

पुण्यातील धक्कादायक दरोडा प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अखेर जेरबंद!

पुणे | पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या प्राणघातक हल्ला व दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी फिरोजखान शरीफखान दुल्होत उर्फ मेवाती याला नाशिक येथून सापळा रचून अटक करण्यात आले आहे. या अटकेनंतर पोलीस विभागाने मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला असून, हा गुन्हा उकलण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई ठरली आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी

▪️ २२ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस हद्दीत प्रभात मार्शल नाईट पेट्रोलिंगदरम्यान सहा अनोळखी इसम धारदार शस्त्रांनिशी दरोड्याच्या तयारीत होते. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता आरोपींनी पोलिसांच्या पोटरीवर वार करत गंभीर जखमी केले.

▪️ स्वसंरक्षणासाठी पोलीस अंमलदाराने शासकीय पिस्टलमधून दोन राउंड फायर करत दोन आरोपींना जखमी केले होते, मात्र अंधाराचा फायदा घेत उर्वरित आरोपी पळून गेले होते.

▪️ या प्रकरणी भारतीय दंड संहिता, हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 फरारी आरोपीला नाशिकमधून अटक

▪️ मुख्य फरार आरोपी फिरोजखान दुल्होत (वय ३४) याच्या नाशिकमध्ये असल्याची गोपनीय माहिती युनिट ६ गुन्हे शाखेचे पो.नि. वाहीद पठाण यांना मिळाली.

▪️ वरिष्ठांच्या परवानगीनंतर सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नाशिकला रवाना करण्यात आले.

▪️ भद्रकाली पोलीस स्टेशनच्या मदतीने बी.डी. भालेकर मैदान, कान्हेरेवाडी, नाशिक येथे सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आले.

▪️ आरोपीवर पूर्वीपासून अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

 गुन्ह्याच्या कलमांतर्गत गंभीर आरोप

▪️ गु.र.नं. १७१ /२०२४
▪️ भादंवि कलम ३१० (१), १२१ (१), १३२
▪️ हत्यार कायदा कलम ४ (२५)
▪️ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३), १३५

 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ,
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 विशेष तपास पथकातील अधिकारी

▪️ पो.नि. वाहीद पठाण
▪️ स.पो.नि. राकेश कदम
▪️ पो.अं. सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे
▪️ व युनिट-६ गुन्हे शाखेचे समर्पित अधिकारी व कर्मचारी

 पुढील तपास

▪️ आरोपीस पुढील चौकशीसाठी डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
▪️ पोलीस आता त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याच्या तयारीत आहेत.
▪️ या अटकेमुळे संपूर्ण दरोडा प्रकरणातील तपासाला वेग मिळणार आहे.

ही कारवाई पुणे पोलिसांची कार्यक्षमता, तात्काळ निर्णयक्षमता आणि गुन्हेगारीविरोधातील निर्धार दर्शवणारी ठरली आहे.