पुणे : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचे गुन्हे शाखा युनिट-४ सक्रिय झाले असून, येरवडा परिसरात दुचाकीवरून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून ₹८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी डेक्कन कॉलेजजवळील मोकळ्या जागेत सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.
मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश :
गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अमलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डेक्कन कॉलेज परिसरात पेट्रोलिंग सुरू केले असताना संशयित स्प्लेंडरवर फिरताना आढळले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
पूछगुचीत आरोपींनी सावंत पेट्रोल पंप ते कॉमर्स झोन रोडवरून पायी चालणाऱ्या इसमाचा मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल आणि चोरलेले मोबाईल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले.
जप्त मुद्देमाल :
वनप्लस नॉर्ड-४ मोबाईल (काळ्या रंगाचा)
ओपो कंपनीचा मोबाईल (पोपटी आणि आकाशी रंगाचा)
स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH-12-VH-4066)
एकूण किंमत : ₹८०,०००/-
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
सदर कामगिरी ही पुणे शहराचे मा. अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) विवेक मिसाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
पुणे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, मोबाईल वापरताना सतर्कता बाळगा, अडगळीच्या भागांतून जाताना मोबाइल सुरक्षित ठेवा, आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.