मुंबई, २ जुलै २०२५ : राज्यात अंमली पदार्थांची (ड्रग्स) तस्करी झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेत जाहीर केलं की, आता ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ लावण्यात येणार आहे.
भाजप आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मेफेड्रोन (एमडी ड्रग्स) च्या वाढत्या तस्करीचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, “राज्य सरकार आता कारवाईच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. ड्रग्स तस्करीचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी मकोका लावण्याचा निर्णय झाला आहे.”
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट तयार करण्यात आले असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात छापे व कारवाया सुरू आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत आतापर्यंत अनेक रॅकेट्स उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
गंभीर प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची केंद्राकडे मागणी
ड्रग्स पाळंमुळं उखडून टाकण्याचा सरकारचा निर्धार
राज्यात अफू किंवा भांगला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही
सीमावर्ती जिल्ह्यांतून होणाऱ्या तस्करीवर विशेष नजर
विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनीदेखील या विषयावर चिंता व्यक्त करत मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतून होणाऱ्या तस्करीचा उल्लेख केला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मुक्ताईनगरसारख्या भागांमध्ये जर असे प्रकार होत असतील तर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल.”
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘जलद सुनावणी, कठोर कायदा आणि जिल्हा पातळीवरील सक्रिय यंत्रणा’ अशा त्रिसूत्रीचा अवलंब करून राज्य सरकार या समस्येवर झडप घालणार असल्याचं संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्य मुद्दे :
ड्रग्स तस्करीवर आता मकोका लावणार – मुख्यमंत्री फडणवीस
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र युनिट कार्यरत
केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी
सीमावर्ती भागांत गांजा-अफू तस्करीवर कठोर नजर
महाराष्ट्रात अशा अंमली पदार्थांना कोणतीही परवानगी नाही